पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेने सील केलेले व्यापारी गाळ्यांचे कुलूप परस्पर उघडून त्यावर दुसरे कुलूप लावून बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी एका दांपत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ मार्च २०२६ रोजी ते ७ मे २०२६ रोजी इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
राजेंद्र आजीत सिंग सोहळ आणि त्यांची पत्नी निलम राजेंद्र सोहळ (दोघे रा. अक्षय सोसायटी, संत तुकारामनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डी.सी.बी. बँकेचे कर्मचारी संदीप प्रकाश पाटील (वय ४२, रा. नवी सांगवी) यांनी शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीतील जयदीप बिझनेस सेंटरमधील शॉप नं. ७ आणि ८ हे कोर्ट कमिशनरच्या आदेशानुसार बँकेने सील केले होते. मात्र, २९ मार्च ते ८ मे २०२६ दरम्यान आरोपींनी या दुकानांचे सरकारी सील तोडून त्या ठिकाणी स्वतःची कुलपे लावली. भोसरी एमआयडीसी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
बँकेने सील केलेले गाळ्यांचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा; भोसरी एमआयडीसीतील प्रकार
