जागेच्या वादातून कोयत्याने खुनी हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – जागेच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना १६ जुलै रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास देहूगाव येथील विठ्ठलवाडी भागात घडली.
केतुल उर्फ भैया संतोष भोसले (वय २५), आकाश संतु दुटे (वय २५), आश्रुबा गायकवाड (वय २६), छाया संत दुटे (वय ४५, सर्व रा. देहूगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालाजी लक्ष्मण जगताप (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कारमधून आले आणि त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. केतुल भोसले याने “तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले, तर आरोपी छाया दुटे हिने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.