pimpri chinchwad crime-कंपनीत कामाच्या वादातून कामगारावर रॉडने हल्ला; डोक्याला पडले आठ टाके
पिंपरी, दि. १३ (pimpri chinchwad crime) – म्हाळुंगे येथील एका प्लॅस्टिक कंपनीत शिफ्ट बदलण्याच्या वेळी झालेल्या वादातून एका कामगाराने आपल्याच सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना आठ टाके पडले आहेत. ही घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
अजय कुमार निशांत (वय २४ वर्षे, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामानंद कुमार (वय ३३ वर्षे, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी कामगाराचे नाव असून त्यांनी
रविवारी (दि. १२ एप्रिल) रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील ‘ॲडव्हॉन्स प्लॅस्टिक कंपनी’मध्ये ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. शिफ्ट बदलत असताना कामाच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने मोल्डिंग मशीन शेजारी असलेला लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. या घटनेत फिर्यादी रामानंद कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत.