पिंपरी, दि. १३ (pimpri chinchwad) – अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही, एका टेम्पो चालकाने नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवले. या टेम्पोने दिलेल्या धडकेत एका २३ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना हिंजवडी येथील माण रोडवर भारत पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि. ११ एप्रिल) रोजी घडली.
यश रवींद्र कुंभारे (वय २३) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. दिलीप मधुकर वाकचौरे (वय ४६ वर्षे, रा. शिवनारायण डेअरी मागे, अरविंद व्हिला बिल्डिंग, जे.पी. रोड, घाटकोपर वेस्ट-मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी टेम्पो चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
रविंद्र पांडुरंग कुंभारे (वय ५३ वर्षे, रा. शेषनगर खर्बीरोड, नागपूर) यांनी रविवारी (दि. १२ एप्रिल) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा यश रविंद्र कुंभारे हा होन्डा ॲक्टिव्हा (MH 14 FQ 1642) वरून जात असताना, आरोपीने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा टेम्पो (MH 03 EG 4886) बंदी आदेशाचा भंग करून चालवला. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी असतानाही आरोपीने हलगर्जीपणे वाहन चालवून यशच्या मोपेडला धडक दिली. या अपघातात यशचा मृत्यू झाला असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
