पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – देहूरोड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मागे पोलिसांनी कारवाई करत एका २० वर्षीय तरुणाला बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.
विर शाम डुलगज (वय २० वर्षे, रा. पारशी चाळ, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रशांत शंकर माळी (वय ३५) यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय क्षेत्रात सध्या शस्त्रबंदी आदेश लागू असताना आरोपी विर डुलगज हा एम.बी. कॅम्पकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला संशयास्पद रितीने थांबला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तुल (मॅग्झीनसह) आणि दोन हजार रुपये किमतीचा एक जिवंत राऊंड, असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. आरोपीने प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक वाव्हळे करत आहेत.
देहूरोड परिसरात गावठी पिस्तुलसह तरुण जेरबंद
