पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ३० एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी शुक्रवारी (दि. १ मे) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तानाजी माणिक शिंदे (वय २८, रा. आळंदी, मूळ रा. केज, जि. बीड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आळंदीच्या इंद्रायणी नदी घाटावर नवीन पुलाखाली आरोपी संशयास्पदरीत्या मिळून आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४६ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही त्याने विनापरवाना हे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आळंदी पोलीस ठाण्यातील हवालदार दोडके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आळंदीच्या इंद्रायणी घाटावर पिस्टलसह तरुणाला अटक
