’नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध केल्याने भाजप महिला मोर्चा आक्रमक; शेकडो महिलांचा सहभाग
पिंपरी-चिंचवड :
देशातील महिला शक्तीचा अपमान आणि केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीने भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी संतापलेल्या महिलांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र रोष व्यक्त केला.
शहरात निघाला भव्य मोर्चा
पिंपरीतील दीपस्तंभ चौक ते गाय वासरू चौक दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. मोहन नगर येथील दत्त मंदिर चौकात जाहीर सभेने या मोर्चाचा समारोप झाला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी केले. यावेळी आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घोषणाबाजीने परिसर दणाणला
“महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो”, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या ऐतिहासिक विधेयकाचा विरोध करणे ही काँग्रेसची जुनी मानसिकता असल्याची टीका यावेळी मान्यवरांनी केली. नारी शक्तीचा अवमान करणाऱ्यांना समाज कधीही माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती
या आंदोलनात संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, गटनेते प्रशांत शितोळे, कुणाल वाव्हळकर, राहुल कलाटे, सुरेश भोईर, राजू दुर्गे, नवनाथ जगताप, अमित बाबर यांच्यासह माजी उपमहापौर शर्मिला बाबर सहभागी होत्या.
तसेच स्नेहा कलाटे, आरती चोंधे, रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, पल्लवी जगताप, अर्चना सस्ते, पल्लवी वाल्हेकर, शालिनी गुजर, शैलजा मोरे, सोनाली गव्हाणे, कविता भोंगळे, मनिषा पवार या महिला नगरसेविकांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. महिला मोर्चाच्या अनघा रुद्र, ऐश्वर्या बाबर, मीनल यादव, रोहिणी मांढरे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.
महिला शक्तीचा इशारा
राहुल गांधी आणि काँग्रेस आघाडी महिलांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केला. केंद्र सरकारच्या महिला हिताच्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांना आगामी काळात चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
