साडे नऊ लाखांच्या मालाचा अपहार; कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसीतील एका नामांकित पॉलिमर कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी संगणमत करून कंपनीतील तब्बल नऊ लाख ४५ हजार २४९ रुपयांच्या तयार मालाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत इंडियन पॉलिमर्स कंपनीत घडली आहे.
​मिलिंद श्रीपाद कुलकर्णी (वय ५८, रा. फ्लॅट नं. सी-१/१०२, खुशबू एक्झॉटिका, पिंपळे गुरव) आणि भगवान सुंदरराव लिंगायत (वय ४०, रा. विनायक नगर, बोऱ्हाडेवाडी, मोशी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे मालक अशोककुमार मिठालाल जैन (वय ५३, रा. एन-३, फ्लॅट नं. ५०१, एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपहार दि. १ जुलै २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान सेक्टर नं. १०, एमआयडीसी भोसरी येथील ‘इंडियन पॉलिमर्स’ या कंपनीत घडला. कंपनीत कार्यरत असलेल्या आरोपी मिलिंद कुलकर्णी आणि भगवान लिंगायत यांनी संगणमत करून कंपनीत तयार झालेला माल मालकांच्या नकळत बाजूला काढला. हा माल त्यांनी त्यांचा मित्र गुरुप्रसाद पाटील याच्या मदतीने नऊ लाख ४५ हजार २४९ रुपयांना बाजारात विकला. या विक्रीतून आलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांनी कंपनीची व फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. ​या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तळेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *