पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील थरमॅक्स चौकाजवळ ही घटना २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तब्बल सव्वा वर्षाने दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
विकास गोविंद पवार (वय २१ वर्षे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकी चालक सिध्दार्थ अजित धाईजे (वय २०, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत विकास यांचा भाऊ धनंजय गोविंद पवार (वय ४८, रा. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास पवार हा त्याचा मित्र सिध्दार्थ आणि पवन गव्हाळे यांच्यासोबत पल्सर दुचाकीवरून (MH14LF8436) प्रवास करत होता. सिध्दार्थने दुचाकी अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडक दिली. या भीषण अपघातात पवन गव्हाळे जखमी झाला असून विकास पवार याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
थरमॅक्स चौकात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू
