वृक्षतोड आणि हवामान बदलाचा फटका; पारंपरिक संस्कृती धोक्यात
पिंपरी–चिंचवड- उन्हाळ्याचा तडाखा वाढला की रसाहार आठवतो. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांना यंदा गावरान आंब्याची खरी चव चाखायला मिळेनाशी झाली आहे. बाजारात आणि घराघरांतून अस्सल गावरान आंब्याचा रस आता गायब झाला आहे.
जुनी झाडे पडली कमी
पूर्वी एप्रिल आणि मे महिना रसाच्या पंगतीने गाजत असे. पाहुणचारासाठी गावरान आंब्यालाच पहिली पसंती असायची. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शहरालगतची गावे आणि ग्रामीण भागातही गावरान आंब्याची मोठी कमतरता जाणवत आहे. वाढती वृक्षतोड यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. अनेक ठिकाणी जळाऊ लाकडासाठी जुन्या आमराया तोडल्या जात आहेत.
हवामान बदलाचा मोठा फटका केवळ वृक्षतोडच नव्हे, तर बदलत्या हवामानाचाही उत्पादनावर परिणाम झाला आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी अवेळी येणाऱ्या उन्हामुळे आंब्याचा मोहोर टिकत नाही. त्यामुळे झाडे असूनही फळांचे उत्पादन घटले आहे. परिणामी, बाजारात मिळणाऱ्या रसात आता ती पूर्वीची गावरान गोडी उरलेली नाही.
संस्कृतीचा वारसा धोक्यात
गावरान आंबा हा केवळ फळ नसून ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी शेताच्या बांधावर झाडांची रांग असायची. दुपारी झाडाच्या सावलीत बसून आंब्यांचा आस्वाद घेतला जात असे. सण-उत्सवाच्या काळात रसाची पंगत हा मानाचा विषय असायचा. मात्र, ही चित्रे आता दुर्मिळ होत आहेत. नवीन पिढीला गावरान आंब्याची खरी चव माहितीच नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
पुनरुज्जीवनाची गरज
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गावरान आंब्याची लागवड पुन्हा एकदा वाढवणे गरजेचे आहे. जर आपण आताच लक्ष दिले नाही, तर गावरान आंब्याची गोडी केवळ आठवणीतच उरेल. जुन्या वाणांचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे.
