सावधान! आंब्याच्या गोडीत रसायनांचा ‘विष’

कॅल्शियम कार्बाइडचा संशय; कृत्रिम पिकवणाऱ्यांवर कारवाई करा
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या हंगामात पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांत आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र या गोड फळामागे रसायनांचा धोका लपलेला असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्‍यात येत आहे.
शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी आणि भोसरी भागातील फळबाजारांत सध्या हापूस, केसर आणि बदामी आंब्यांची मोठी विक्री होत आहे. मागणी वाढल्याने काही व्यापारी जलद नफ्यासाठी कृत्रिम पद्धतीने आंबे पिकवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये बंदी असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एफडीएच्‍या पथकाने संशयास्पद आंब्यांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रसायनांच्या पावडरचा थेट वापर केल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, अशा रसायनयुक्त आंब्यांमुळे पोटदुखी, मळमळ आणि इतर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. दीर्घकाळात गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी फळे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या शहरात जनजागृतीवर भर देण्यात येत असून व्यापाऱ्यांना सुरक्षित पद्धतीने फळे पिकवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *