पिंपरी-चिंचवड :
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने आज सकाळी ८:०० वाजता प्रसिद्ध केलेल्या भीमा खोरे पूरनियंत्रण अहवालानुसार, मावळ तालुक्यातील पवना, आंद्रा, कासारसाई आणि वडिवळे या प्रमुख चार धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला वाढत्या उन्हाच्या तीव्रतेतही पवना धरणाने ३६ टक्क्यांहून अधिक साठा राखून ठेवला आहे.
पवना धरणाची स्थिती
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळच्या ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्या ३६.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची एकूण पाणी पातळी ६०४.६९ मीटर असून उपयुक्त साठा ८८.७६ दशलक्ष घनमीटर (३.१३ टी.एम.सी.) इतका आहे. यावर्षी आतापर्यंत धरण क्षेत्रात २७१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यातील इतर धरणांचा आढावा
आंद्रा धरणात सध्या ४१.९५ टक्के उपयुक्त साठा असून तो ३४.७२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. तर वडिवळे धरणाची टक्केवारी ५५.४८ टक्के असून तालुक्यातील इतर धरणांच्या तुलनेत येथील साठा अधिक आहे. तसेचकासारसाई धरणात सध्या ३३.८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मावळमधील या चारही धरणांमध्ये मिळून पिण्यासोबतच सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने सध्यातरी पाणी कपातीचे संकट टळल्याचे चित्र दिसत आहे. मात्र यंदाच्या वर्षी कमी पाऊस होणार असल्याचे पुणे वेधशाळेने जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठी हा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याच्या सूचना शासनाने जलसंपदा विभागाला केल्या आहेत.
