वाऱ्याच्या तडाख्यात मेट्रोची सुरक्षा उडाली; भक्ती-शक्ती चौकात लोखंडी पत्र्यांचा थरार

भरदिवसा पुलावरून पत्रे कोसळली; वाहनधारकांची धावपळ, मेट्रो प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप

पिंपरी-चिंचवड ः
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान शनिवारी दुपारी मोठा अनर्थ टळला. जोरदार वाऱ्यामुळे मेट्रो पुलावरील लोखंडी संरक्षक पत्रे थेट रस्त्यावर कोसळली. त्या वेळी चौकात वाहनांची मोठी वर्दळ होती. अचानक पत्रे खाली पडल्याने काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शनिवारी दुपारनंतर शहरात वाऱ्याचा वेग अचानक वाढला होता. त्याचवेळी निगडी परिसरात मेट्रो विस्तारीकरणाचे काम सुरू होते. पुलावर लावण्यात आलेले मोठे लोखंडी पत्रे वाऱ्याच्या तडाख्यात उखडले गेले. काही पत्रे थेट मुख्य रस्त्यावर येऊन आदळली. आवाज झाल्यानंतर वाहनधारकांनी तत्काळ वाहने थांबवली. काही दुचाकीस्वारांनी बाजूला पळ काढला. पादचाऱ्यांमध्येही घबराट पसरली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमुळे मेट्रोच्या कामातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मेट्रो प्रकल्पातील निष्काळजीपणाची ही पहिली घटना नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यापूर्वीही मेट्रोचे काम सुरू असताना एक मोठा काँक्रीट कॉलम कोसळल्याची घटना घडली होती. त्या वेळी ग्रेड सेपरेटरवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रात्रीच्या वेळी घटना घडल्याने जीवितहानी टळली होती. मात्र, आता भरदिवसा लोखंडी पत्रे कोसळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वादळी परिस्थितीतही पुलावरील पत्रे सुरक्षितपणे बसवण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पत्रे नीट वेल्डिंग केली होती का, त्यांना मजबूत आधार देण्यात आला होता का, याबाबतही शंका व्यक्त होत आहेत. मेट्रो प्रशासनाकडून कंत्राटदारांच्या कामावर योग्य नियंत्रण ठेवले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

या घटनेनंतर भक्ती-शक्ती चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. “आज नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. मात्र, अशी घटना पुन्हा घडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि मेट्रो कामांमध्ये तातडीने सुरक्षा उपाय वाढवावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *