पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा ओघ वाढला असून, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शहराच्या विकासनिधीत १८३ कोटी १४ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या सवलतींचा फायदा घेत १ लाख ८२ हजार ३३५ मालमत्ताधारकांनी आपला कर भरून सुजाण नागरिकत्वाचा परिचय दिला आहे.
डिजिटल पेमेंटचा ‘टक्का’ वाढला
महापालिकेने ऑनलाईन कर भरण्यावर १० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केल्यामुळे नागरिकांनी रांगेत उभे राहण्याऐवजी घरबसल्या कर भरण्याला पसंती दिली आहे.
एकूण जमा झालेल्या १८३ कोटींपैकी १६९ कोटी ५० लाख रुपये हे केवळ ऑनलाईन माध्यमांतून जमा झाले आहेत.
१ लाख ६५ हजार ४२४ मालमत्ताधारकांनी या १० टक्के ऑनलाईन सवलतीचा थेट लाभ घेतला आहे.
३० जूनपर्यंत ‘सवलतींचा पाऊस’
नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पालिकेने ३० जूनपर्यंत विशेष मुदत दिली आहे:
१०% सवलत: ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा ऑनलाईन भरणा केल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते.
महिलांसाठी विशेष सवलत: कुटुंबातील महिलेच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
आतापर्यंत महापालिकेने ६ लाख ६५ हजार ४७० मालमत्तांचे बिल वाटप पूर्ण केले आहे.
थकबाकीदारांवर ‘जप्ती’चे सावट
एकूण १८३ कोटींचे संकलन झाले असले तरी, ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही अशा थकबाकीदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत ३४ हजार १०८ थकबाकीदारांना जप्तीपूर्वीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
”दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा,” असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
”नागरिकांनी दिलेला हा कर शहराच्या रस्ते, पाणी आणि आरोग्यासारख्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी वापरला जाईल. ३० जूनपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ घ्या.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
अद्याप आपला मालमत्ता कर भरला नसेल, तर ३० जूनपूर्वी www.pcmcindia.gov.in वर जाऊन तो भरा आणि १०% पर्यंत सवलत मिळवा!
