Mumbai-राज्यात १५ ते २२ जुलैदरम्यान विशेष आरोग्य शिबिरे; कर्करोग, असंसर्गजन्य आजार आणि रक्तदानावर भर
मुंबई(Mumbai) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यभर विशेष आरोग्य तपासणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात येणार असून प्रतिबंधात्मक आणि विशेष आरोग्य सेवांवर भर दिला जाणार आहे.
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिरांचे अधिकाधिक आयोजन करण्याच्या सूचना हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रक्तदानाबाबत जनजागृती करून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त भंडारी, संचालक पल्लवी सापळे उपस्थित होते. तसेच छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
या विशेष आरोग्य मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.