महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, उद्योग विभागातील प्रस्ताव लालफितीत अडकणार नाहीत. त्याऐवजी उद्योजकांना ‘फास्ट ट्रॅक’ मंजुरी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी गतिमान यंत्रणा उभारली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उद्योग विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र एमएसएमई शिखर परिषद आणि पुरस्कार २०२६’ सोहळ्यात ते बोलत होते. नवी मुंबईतील वाशी येथे पार पडलेल्या या परिषदेत राज्यातील एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक धोरणे, गुंतवणूक, नवकल्पना आणि उद्योगवाढीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उद्योग क्षेत्राला अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि रोजगाराभिमुख बनविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असून, उद्योजकांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, विकास आयुक्त डॉ. कादंबरी बळकवडे तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
