नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हरियाणा आणि राजस्थान सरकारदरम्यान यमुना जल प्रकल्पाच्या उभारणी व अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे दोन्ही राज्यांतील सुमारे तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या करारानुसार राजस्थानातील सीकर, चुरू आणि झुंझुनू जिल्ह्यांसह हरियाणातील भिवानी आणि फतेहाबाद या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या योजनेअंतर्गत पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. हे पाणी साठवून ते पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याबरोबरच मोठ्या जलाशयांमध्ये संचयित केले जाईल. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार असून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा करार हरियाणा आणि राजस्थान या दोन्ही राज्यांसाठी “विन-विन” परिस्थिती निर्माण करणारा निर्णय असल्याचे सांगितले. राज्यांमधील समन्वयातून जलसंपत्तीचा प्रभावी वापर करून नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यमुना जल प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांतील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, भविष्यात जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
