पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – नव्याने उभारण्यात येत असलेल्या बीअर उत्पादन कंपनीतील तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या स्टील स्टोअरेज टाक्या चोरीला गेल्या. याप्रकरणचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. कंपनीतील माजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली असून चोरीला गेलेल्या सर्व दहा टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
खेड तालुक्यातील सावरदरी येथील ‘टाईने रिबेल’ या बीअर उत्पादन कंपनीतून २० फेब्रुवारी ते ३० मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दहा स्टील टाक्या लंपास केल्या होत्या. याबाबत विवेक मारुती खैरे यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेनंतर अनेक दिवस उलटल्यानंतर गुन्हा उघडकीस आल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.
पोलिसांनी परिसरातील ३० ते ३५ कंपन्यांचे तब्बल ६०० जीबीहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान एक संशयास्पद क्रेन आणि ट्रक आढळून आला. तांत्रिक तपासातून कंपनीचा माजी कर्मचारी प्रसाद विनोद राजळे (वय २९, रा. पिरंगुट) याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा कट उघड झाला.
या प्रकरणात चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी कुदळवाडी आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या सर्व टाक्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला ३६ लाखांच्या स्टील टाक्या चोरीचा गुन्हा उघड
