कुंडमळा येथे इंद्रायणीत पोहताना तरूणाचा बुडून मृत्यु

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेल्या तरूणाचा इंद्रायणी नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
प्रथमेश लोणारी (वय २४, रा. मांजरी खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी याबाबत माहिती दिली. प्रथमेश हा चार – पाच मित्रांसमवेत कुंडमळा येथे फिरायला आला होता. सायंकाळी सर्व मित्र इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने प्रथमेश बुडाला. त्याच्या मित्रांनी त्वरीत आरडाओरडा केला. सागर भेगडे यांनी त्वरीत वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना हा प्रकार कळविला. काही वेळातच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि शोधकार्य सुरु केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात प्रथमेशला शोधण्यात टीमला यश आले. त्याला त्वरीत तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पीटल येथे नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या शोध मोहिमेत वन्यजीव रक्षक आणि शिवदुर्गचे निलेश गराडे, भास्कर माळी, रवी कोळी, विराज गराडे, विनय सावंत, शाहरुख सय्यद, राजु सय्यद, सागर भेगडे, कुंदन भोसले आदींनी सहभाग घतला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *