पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ची पहिलीच कारवाई

टोळी प्रमुखासह पाच जणांवर मोठी कारवाई

पिंपरी :शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची (मेफेड्रोन – एमडी) अवैध विक्री करणाऱ्या एका संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख मेबूब उर्फ मुसा खान याच्यासह त्याच्या चार साथीदारांवर हा बडगा उगारण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
१२ डिसेंबर २०२५ रोजी सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, बारा घोलप महाविद्यालयाजवळ दोन इसम अमली पदार्थांची विक्री करताना रंगेहात पकडले गेले होते. त्यांच्याकडे ५५ ग्रॅम २१ मिली ग्रॅम ‘एमडी’ हा अमली पदार्थ मिळून आला होता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, हे आरोपी केवळ वैयक्तिकरित्या नव्हे तर एका संघटित टोळीच्या माध्यमातून हा व्यवसाय करत होते.

कारवाई झालेल्या आरोपींची नावे:
१. मेबूब कमरुद्दीन करपुडे उर्फ मुसा खान (वय ३२, रा. हडपसर, पुणे) – टोळी प्रमुख
२. प्रतिक सचिन सपकाळे (वय २८, रा. खडकी, पुणे)
३. अमीन फिरोज खान (वय २३, रा. घोरपडी पेठ, पुणे)
४. रफीक अबुबकर मेमन (वय ६२, रा. कोंढवा, पुणे)
५. वसीम इसक बेग (वय ३७, रा. धाराशिव)

८.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी या कारवाईत ५५ ग्रॅम एमडी ड्रग्स, मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या टोळीवर ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता, ज्याला अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी मंजुरी दिली.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि विक्रम गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

नागरिकांना आवाहन:
आपल्या परिसरात अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ अमली पदार्थ विरोधी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क क्रमांक: ८६००००२३२०
हेल्पलाईन: ११२ / ११३३
पोर्टल: www.ncbmanas.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *