पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुना कचरा डेपो रोड, सदगुरूनगर, भोसरी येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर साळवे यांनी गुरुवारी (दि. १७ एप्रिल) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजाभाऊ गोविंद पालकर (वय ५१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), सुभाष थावरू राठोड (वय ३९, रा. सदगुरूनगर, भोसरी), अभय बाजीराव ओव्हाळ (वय ३८, रा. दिघी रोड, भोसरी), अकबर मुनीर शेख (वय ५२, रा. सदगुरूनगर, भोसरी), रामदास पोपट गायकवाड (वय ४२, रा. भोसरी) आणि देवा मानू राठोड (वय ३६, रा. सदगुरूनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी तीन पत्ती जुगार खेळत असताना पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून ४ लाख १६ हजार ८९० रुपयांचे जुगाराचे साहित्य, मोबाइल, दुचाकी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
भोसरीत तीन पत्ती जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल
