Pimpri-Chinchwad-पार्किंगमधील दोन ई-स्कूटर अचानक पेटल्या; महिला जखमी; तीन लाखांचे नुकसान अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड :
चिंचवडमधील चिंचवडे नगर येथे सोमवारी सकाळी एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. पार्किंगमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. या दुर्घटनेत दोन्ही ई-स्कूटर, एअर कंडिशनर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

सकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींमधून अचानक धूर निघू लागला. त्यानंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्याने इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट किंवा बॅटरीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशामक केंद्र, थेरगाव अग्निशामक केंद्र आणि मुख्यालयातून असे तीन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग इमारतीत पसरली नाही आणि मोठी जीवितहानी टळली.

आगीच्या धुरामुळे आणि गोंधळात एक महिला किरकोळ जखमी झाली. तिला तातडीने थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या आगीत दोन्ही इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळाल्या. पार्किंगमधील एसी आणि इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. एकूण सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, विनायक नावे, शहाजी कोपनर, नितीन कोकरे आणि भूषण येवले यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी धाडसी आणि तत्पर कारवाई करत काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षित चार्जिंग आणि देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *