पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून सुवर्णयुग सहकारी बँकेची सात कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना गणेश व्हिजन, आकुर्डी येथे घडली.
मॅसकॉर्प कंपनीचे संचालक अॅलेन अरुन बनसोडे (वय 47), सोनिया अरुण बनसोडे (वय 48), सोलोमन अॅलेन बनसोडे (वय 29) आणि सेवारा बुरखानोबा (वय 35, सर्व रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीच्या क्षेत्र व्यवस्थापक शिरीन रऊफ शेख (वय 54) यांनी बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपरी इंडस्ट्रियल एरियातील 1864 मीटर क्षेत्रफळ असलेल्या एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक 4 डी 3 ची खोटी कागदपत्रे बनवली. ही बनावट कागदपत्रे सुवर्णयुग बँकेच्या निगडी शाखेत सादर करून सात कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्ज प्रक्रियेसाठी एमआयडीसीची बनावट ना-हरकत प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे वापरून बँकेची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास निगडी पोलीस करत आहेत.
बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची साडेसात कोटींची फसवणूक
