मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. हा संभाव्य पक्षप्रवेश शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच होणार असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे शिवसेनेतील अंतर्गत राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खासदार सध्या दिल्लीत दाखल झाले असून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर ते शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र सादर करू शकतात, असा दावा केला जात आहे.
राजकीय वर्तुळात या संपूर्ण हालचालींना ‘ऑपरेशन टायगर’चा पुढील टप्पा म्हणून पाहिले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या राजकीय रणनीतीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र दिल्ली आणि मुंबईतील राजकीय हालचालींमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनीच असा मोठा राजकीय बदल घडल्यास राज्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील काही दिवसांत या प्रकरणावर स्पष्टता येण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष आता 19 जूनच्या कार्यक्रमाकडे लागले आहे.
