Pimpri Chinchwad -सातबार्‍यावर वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेताना चर्‍होलीचा तलाठी अन् खासगी इसम जाळ्यात!*

(pimpri chinchwad)-सातबार्‍यावर वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेताना चर्‍होलीचा तलाठी अन् खासगी इसम जाळ्यात!*

 

*दोन लाख रुपयांची केली होती मागणी; तडजोडीअंती ७० हजार स्वीकारताना ACB ने आवळल्या मुसक्या*

 

*पिंपरी-चिंचवड* वडिलोपार्जित शेतजमिनीवर वडिलांचे आणि काकांचे नाव वारसदार म्हणून ७/१२ पार्‍यावर लावण्यासाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती ७० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना चर्‍होली बुद्रुक येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि त्याच्या खासगी हस्तकाला (एजंट) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धडक कारवाई सोमवारी (दि. ८) दुपारी ३:१२ वाजताच्या सुमारास चर्‍होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात करण्यात आली.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि हवेली तालुक्यातील महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

सुनील भिकाजी सातोसे (वय ४४, ग्राम महसूल अधिकारी – तलाठी, चर्‍होली बुद्रुक. रा. आय ट्रेंड लाईफ, वाकड, पुणे. मूळ गाव- केंबळी, ता. कागल, जि. कोल्हापूर) – (वर्ग-३) आणि नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०, खासगी व्यक्ती, रा. काकडे सिटी, चर्‍होली-खुर्द रोड, ता. हवेली, जि. पुणे) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

 

*पैशांसाठी ६ महिने फिरवले हेलपाटे!*

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजोबांची चर्‍होली बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमीन आहे. आजोबांच्या निधनानंतर या शेतजमिनीवर तक्रारदार यांचे वडील आणि काका यांची ‘वारस नोंद’ करण्यासाठी तक्रारदारांनी डिसेंबर २०२५ मध्ये तलाठी सुनील सातोसे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, ६ महिने उलटून गेल्यानंतर आणि तक्रारदारांनी वारंवार चकरा मारूनही सातोसे याने वारस नोंद केली नाही.

 

दि. २९ मे २०२६ रोजी तक्रारदार पुन्हा चौकशीसाठी गेले असता, तलाठी सातोसे याने हे काम करण्यासाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीत त्याने ८० हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १ जून २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.

 

*’एसीबी’च्या पडताळणीत तडजोड, अखेर जाळ्यात!*

तक्रारीच्या अनुषंगाने ‘एसीबी’च्या पथकाने ४ जून २०२६ रोजी चर्‍होली येथे लाच मागणीची पडताळणी (वेरिफिकेशन) केली. त्यादरम्यान तलाठी सातोसे याने ८० हजारांमधून आणखी १० हजार कमी करत ७० हजार रुपयांची अंतिम मागणी केली आणि हे पैसे त्याचा खासगी हस्तक नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितले.

 

आज, सोमवार दि. ८ जून रोजी दुपारी चर्‍होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात लाचेचा सापळा रचण्यात आला होता. तलाठी सातोसे याच्या सांगण्यावरून खासगी इसम नेमाजी भोकरे याने तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदरची धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ‘एसीबी’च्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ करत आहेत.

 

,*लाच मागणाऱ्यांची गय नाही: ‘एसीबी’चे आवाहन*

कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती (एजंट) कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी केले आहे.

 

*ACB पुणे कार्यालय संपर्क:* 020-26122134 / 9403781064

व्हॉट्सॲप क्रमांक: 9403781064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *