Mumbai- मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार आधुनिकीकरण; आशिष शेलारांचे बीएमसीला कडक निर्देश*

(Mumbai)-मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार आधुनिकीकरण; आशिष शेलारांचे बीएमसीला कडक निर्देश*

 

मुंबईकरांना जागतिक दर्जाची, अधिक कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सर्वंकष आधुनिकीकरण करण्यात यावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. महानगरपालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), स्वच्छतागृहे, प्रशासकीय कार्यपद्धती आणि वैद्यकीय सेवांचा सखोल आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविणारा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, विविध आमदार, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री शेलार यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या लाखो रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांनुसार आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी केवळ आर्थिक तरतुदींवर अवलंबून न राहता अत्याधुनिक ‘मेडिटेक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

महानगरपालिका रुग्णालयांतील ओपीडी विभाग आणि स्वच्छतागृहांच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी या सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. रुग्णांना स्वच्छ, सुसज्ज आणि सन्मानजनक वातावरणात उपचार मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचा नियमित आढावा घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

राज्य सरकारच्या आरोग्य विभाग, नगरविकास विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले. विविध विभागांमधील समन्वय वाढल्यास आरोग्य क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईची आरोग्य व्यवस्था देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणांपैकी एक मानली जाते. दररोज हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या महानगरपालिका रुग्णालयांमध्ये तांत्रिक आधुनिकीकरण, डिजिटल व्यवस्थापन आणि रुग्णाभिमुख सेवा राबविल्यास आरोग्य सेवांचा दर्जा आणखी उंचावू शकतो. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिलेले निर्देश आगामी काळात मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *