नवी दिल्ली | प्रतिनिधी : शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, नीट पेपरफुटी आणि विविध भरती व प्रवेश परीक्षा घोटाळ्यांविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेले आंदोलन मंगळवारीही कायम आहे. सोमवारी झालेल्या पोलिस कारवाईनंतरही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही प्रमुख मागणी आहे.
सोमवारी CJPचे पदाधिकारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अभिजीत दीपके यांनी ही बैठक निष्फळ ठरल्याचा दावा करत, त्यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे सांगितले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर आणि परिसरात अर्धसैनिक दलासह कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून, अशोक रोडपर्यंत सुरक्षा घेरा वाढविण्यात आला आहे.
सोमवारी संसद मार्चदरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यापैकी बहुतांश आंदोलनकर्ते आपल्या घरी परतले असले तरी काही जण अद्याप आंदोलनस्थळी ठाम आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अभिजीत दीपके यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
