मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्रात २१ जुलैपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
