पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – निगडी येथील मधुकर पवळे पुलाखाली असणाऱ्या ट्रॅव्हल्स बुकिंग ऑफिसजवळ पैशांच्या आणि अपंग मुलाला झालेल्या मारहाणीच्या कारणावरून गंभीर हाणामारी झाली आहे. ही घटना १६ जुलै रोजी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या फिर्यादीनुसार, आरोपी ओपन देशा काळे (वय ६०, रा. आझाद चौक, ओटा स्कीम, निगडी, पुणे) याने फिर्यादी नितेश शांताराम पदमने उर्फ छमछम म्हस्के (वय ३०) व त्यांच्या मैत्रिणीकडे १०० रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी ओपन काळे याने सपना म्हस्के उर्फ रोहित घिगे हिच्या डोक्यात खुरप्याने वार करून गंभीर जखमी केले.
तर दुसऱ्या बाजूने दाखल झालेल्या परस्पर विरोधी फिर्यादीनुसार, आरोपी सपना म्हस्के उर्फ रोहित घिगे आणि छमछम म्हस्के (वय ३०, दोघे रा. लहुजी वस्ताद नगर, प्राधिकरण) यांनी आपल्या अपंग मुलाला का मारले? असा जाब विचारणाऱ्या फिर्यादी ओपन देशा काळे (वय ६०) यांच्यावरच लोखंडी खुरप्याने आणि पाइपने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे.
निगडीत किरकोळ वादातून हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल
