Delhi-नव्या शिक्षणमंत्र्यांनाही प्रवक्ते सौरव दास यांचा इशारा; “विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत तर जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन”
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने नव्या शिक्षणमंत्र्यांनाही स्पष्ट इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या प्रमुख प्रवक्ते सौरव दास यांनी दिला.
सौरव दास म्हणाले, “देशातील युवकांनी नव्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा जंतर-मंतरवर परतू आणि सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी करू.”
याचवेळी पक्षाचे नेते आशुतोष रांका म्हणाले, “आज काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना आहे. आता जो कोणी नवा शिक्षणमंत्री होईल, त्याने प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करावे, अशी आमची अपेक्षा आहे. जंतर-मंतर हे देशातील युवकांच्या आवाजाचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही सातत्याने देशासमोर मांडत राहू.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थी आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल आणि नव्या नेतृत्वाकडून कोणते निर्णय घेतले जातील, याकडे देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.