पिंपरी-चिंचवड :
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात येण्याची गरज भासणार नसून त्यांच्या तालुक्यातच वाहन चालविण्याची चाचणी देता येणार आहे.
या विशेष शिबिरांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटचा कोटा आज, ३० जून रोजी सायंकाळी नेमक्या पाच वाजता आरटीओच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. इच्छुक वाहनधारकांनी विलंब न करता ऑनलाईन नोंदणी करून आपला स्लॉट निश्चित करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
आरटीओने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार खेड येथे १, २ आणि ३ जुलै, मंचर येथे ६, ७ आणि ८ जुलै, जुन्नर येथे १३, १४ आणि १५ जुलै, वडगाव मावळ येथे २०, २१ आणि २२ जुलै, तर लोणावळा येथे २७ आणि २८ जुलै रोजी वाहनचालक अनुज्ञप्ती चाचणी शिबिरे होणार आहेत.
शिबिरांमध्ये नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रतिदिन १२० उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये हलक्या चारचाकी वाहनांसाठी ४० जागा, गिअर असलेल्या दुचाकीसाठी ४५ जागा, विनागिअर दुचाकीसाठी १३ जागा, व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी १० जागा, रिक्षा व मालवाहू तीनचाकी वाहनांसाठी १० जागा आणि इतर वाहनांसाठी दोन जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या शिबिरांसाठी खेड, मंचर आणि तळेगाव दाभाडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची शासकीय विश्रामगृहे तसेच लोणावळ्यातील तुंगार्ली शाळेचे मैदान चाचणीसाठी निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील वाहनधारकांना वेळ, प्रवास आणि खर्चाची बचत व्हावी, या उद्देशाने आरटीओने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होत असल्याने वाहनधारकांनी तातडीने अर्ज करून आपला स्लॉट निश्चित करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
