दापोडीत एका दिवसात पाच जणांच्या मृत्यूने खळबळ; परिसरात भीतीचे वातावरण दोन सख्ख्या भावांसह पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; अफवांमुळे पोलीसांची धावपळ

 

पिंपरी-चिंचवड

दापोडी परिसरात गुरुवारी एका दिवसात पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. एकाच दिवशी सलग मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), राजेंद्र राजपूत (वय ५१) आणि अकबर पठाण (वय ५२) यांचा समावेश आहे. यातील विजय आणि राजेंद्र राठोड हे सख्खे भाऊ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय राठोड हे मुव्हर्स अँड पॅकर्स कंपनीत काम करत होते. बुधवारी विश्रांतवाडी परिसरात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली. सहकाऱ्यांनी त्यांना खडकी कॅंटोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
भावाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर राजेंद्र राठोड यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांना अचानक फीट आली. तोंडातून फेसही आला. कुटुंबीयांनी त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पांडुरंग फुगे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र राजपूत हे गुरुवारी सकाळी घरातील बाथरूममध्ये गेले असताना त्यांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळले. त्यांना वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अकबर पठाण यांचीही प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात विविध अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे पोलीसांची धावपळ उडाली. पोलीसांनी सर्व मृतांच्या नातेवाईकांची चौकशी केली असून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
“दापोडीतील मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे. मृत पाच जणांपैकी चार जणांना दारूचे कोणतेही व्यसन नव्हते. केवळ एका व्यक्तीला दारूचे व्यसन होते. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”
सचिन हिरे, सहायक पोलीस आयुक्त,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *