झाडांच्या शेंड्यावर घरटी बांधण्याची लगबग; कमी पावसाच्या चर्चांना उधाण
मावळ :
मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे मावळातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याचे अंदाज एकीकडे असताना ग्रामीण भागात मात्र आजही निसर्गाच्या खुणांवर विश्वास ठेवला जातो. कावळ्यांनी बांधलेल्या घरट्यांवरून यंदाच्या पावसाचा अंदाज बांधला जात आहे. सध्या अनेक ठिकाणी झाडांच्या शेंड्यावर घरटी दिसत असल्याने कमी पावसाची चर्चा रंगू लागली आहे.
मावळ तालुक्यात एप्रिल आणि मे महिन्यात पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. कावळा, चातक आणि इतर काही पक्ष्यांच्या हालचालींवरून ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक पावसाचा अंदाज व्यक्त करतात. अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेली ही पारंपरिक पद्धत आजही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
कावळ्याचे घरटे कोणत्या दिशेला आणि किती उंचीवर आहे, याला विशेष महत्त्व दिले जाते. पूर्व दिशेला घरटे असल्यास चांगल्या पावसाची शक्यता मानली जाते. उत्तर दिशेला घरटे असल्यास समाधानकारक पाऊस होईल, असा समज आहे. दक्षिण दिशेला घरटे असल्यास वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तर पश्चिम दिशेला घरटे असल्यास पावसाचे प्रमाण कमी राहते, असे मानले जाते.
घरट्याची उंचीदेखील महत्त्वाची मानली जाते. झाडाच्या मधोमध घरटे असल्यास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, असा अंदाज व्यक्त केला जातो. झाडाच्या खालच्या भागात घरटे असल्यास मुसळधार पावसाचे संकेत मानले जातात. मात्र झाडाच्या अगदी शेंड्यावर घरटे बांधले असल्यास कमी पाऊस किंवा दुष्काळी परिस्थितीची शक्यता वर्तवली जाते.
यंदा मावळातील अनेक भागांत कावळ्यांची घरटी झाडांच्या वरच्या भागात दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये पावसाबाबत चर्चा सुरू आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनीही याकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, वाढते शहरीकरण आणि वृक्षतोड यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी गावांमध्ये सहज दिसणारे पक्षी आता विरळ झाले आहेत. अनेक पक्ष्यांनी गावाबाहेरील शांत आणि निर्जन भागांचा आश्रय घेतला आहे.
हवामान खात्याचे अंदाज आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे महत्त्व कायम असले तरी निसर्गाच्या संकेतांकडे दुर्लक्ष करता येत नाही, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदाच्या पावसाबाबत मावळचा बळीराजा आकाशासोबतच कावळ्यांच्या घरट्यांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहे.
