पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – रायगड येथील पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ पासून १२ जून २०२६ दरम्यान वाघोली, मोशी तसेच मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
सुरज रामदास शिवले (वय ३५, रा. वखारीचा मळा, वढु बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे), बिपीन दिपक मोहिते (वय ४०, रा. नाशिक) आणि संतोष चंद्रकांत कटारे (वय ३८, रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयुर भाऊसाहेब पोळ (वय २४, रा. गुरुकृपा निवास, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघोली येथील जिद्द ॲकॅडमीमध्ये पोलीस भरतीचा सराव करत असताना त्याची एका आरोपीशी ओळख झाली. आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला व पोलीस भरतीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने ऑनलाइन स्वरूपात एकूण तीन लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.
पोलीस भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
