मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प, सरकारच्या भूमिकेवर सुरू असलेला वाद आणि विरोधकांवर करण्यात आलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“वैफल्य, अहंकार, माज… हे सर्व क्षणात उतरेल. महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. पण काय करणार? खाण तशी माती!” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार आणि झुंडबाजी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे का? सरकारविरोधात बोलायचे नाही, प्रश्न विचारायचे नाहीत, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवायचा नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. लोकशाहीमध्ये टीका करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच मिसिंग लिंक प्रकल्पावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्राची बदनामी करू नका, असा इशारा दिला होता. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र झाली आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, त्यांच्या टीकेला सत्ताधारी काय प्रत्युत्तर देतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
