​पिंपरी-चिंचवडमध्ये टोळ्यांचे पेव; ‘मोक्का’चा धाक ओसरला?

​सव्वा वर्षात ३०७ गुन्हेगारांवर कारवाई, तरीही गल्लोगल्ली भाईंची दहशत; अल्पवयीन मुलांच्या हाती पिस्तुले

​पिंपरी-चिंचवड :
औद्योगिकनगरीत गुन्हेगारीचा चेहरा वेगाने बदलत आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कंबर कसली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या तीन महिन्यांत १६ टोळ्यांमधील ७९ गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. मात्र, पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’नंतरही शहरात गुन्हेगारीचे नवे जाळे विणले जात आहे. एक टोळी संपली की दुसरी तयार होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

​कारवाईचा धडाका, पण…
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम राबवली जात आहे. २०२५ मध्ये ४५ टोळ्यांमधील २२८ आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाली. गेल्या सव्वा वर्षाचा विचार केल्यास एकूण ६१ टोळ्यांमधील ३०७ गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले आहे. या टोळ्यांनी खून, दरोडा, खंडणी आणि अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांद्वारे शहरात दहशत निर्माण केली होती. सातत्यपूर्ण कारवाईमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा पोलीस करत आहेत.

​अल्पवयीन मुलांच्या हाती ‘ट्रीगर’
पोलीस कारवाई करत असले तरी गल्लोगल्ली नवीन टोळ्या जन्माला येत आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, आता अल्पवयीन मुलांकडेही पिस्तुले सापडू लागली आहेत. ही मुले टोळ्यांच्या प्रभावाखाली येऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत. यामुळे शहरातील पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

​योजना कागदावरच?
गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी ‘विविध योजना’ राबवल्या.. मात्र, या योजनाचा प्रभाव जमिनीवर दिसत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत आहेत. हद्दपार केलेले गुन्हेगार शहरात बिनधास्त वावरताना दिसतात. पोलिसांच्या नाकाखाली गुन्हेगार वावरत असल्याने यंत्रणेच्या वचकावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

​राजकीय वरदहस्त आणि आर्थिक जाळे
शहरातील काही टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. राजकीय संरक्षणामुळे पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा येत आहेत. केवळ अटक करून गुन्हेगारी थांबणार नाही. या टोळ्यांचे आर्थिक स्त्रोत तोडणे गरजेचे आहे. जोपर्यंत त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जात नाही, तोपर्यंत ही साखळी तुटणे कठीण आहे.

​नागरिकांचा सवाल: पोलीस कुठे आहेत?
शहरात असुरक्षिततेची भावना वाढत आहे. “पोलीस नक्की कुठे आहेत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. सामान्य माणसाला शहरात सुरक्षित फिरता यावे, यासाठी आता ठोस आणि अधिक आक्रमक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *