अवयवदानातून कटारिया परिवाराचा समाजासमोर आदर्श तळेगाव स्टेशन येथील युवकाच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान

तळेगाव स्टेशन, प्रतिनिधी :
तळेगाव स्टेशन येथील वियश विनोद कटारिया (वय २३) यांचे ११ मे २०२६ रोजी अपघाती निधन झाले. या दुःखद प्रसंगातही कटारिया परिवाराने अत्यंत धाडसी आणि मानवतेचा संदेश देणारा निर्णय घेत मरणोत्तर अवयवदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
वियश कटारिया यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराने वैद्यकीय पथकाशी समन्वय साधत त्यांच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दोन किडनी, लिव्हर आणि हृदयाचे दान करण्यात आले असून या अवयवांमुळे चार गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
अवयवदानाचा निर्णय हा अत्यंत कठीण मानला जातो. अज्ञान, अंधश्रद्धा तसेच धार्मिक समजुतींमुळे अनेक कुटुंबे अशा निर्णयापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत मनाचा मोठा खंबीरपणा आवश्यक असतो. कटारिया परिवाराने हा धाडसी निर्णय घेत मानवतेला सर्वोच्च स्थान दिल्याचे दिसून आले.
अवयवदानासाठी वेळेचे मोठे महत्त्व असते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागते. यासाठी परिवारातील सर्व सदस्यांचे एकमत आणि सहकार्य अत्यंत आवश्यक असते. कटारिया परिवाराने ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
ज्या रुग्णांना हे अवयव मिळाले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी कटारिया परिवार देवदूत ठरला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू थांबवणे शक्य नसले, तरी त्याच्या जाण्यानंतर अनेकांना जीवनदान देण्याचा मार्ग अवयवदानातून खुला होतो, हे या घटनेतून अधोरेखित झाले.
समाजात रक्तदानाप्रमाणेच अवयवदानाबाबतही जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. कटारिया परिवाराच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून इतर कुटुंबांनाही अवयवदानासाठी प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *