मुंबई/पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसराला बसला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत, तर नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला आहे.
या निर्णयामुळे मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला असून, अनेक वाहने विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस आणि संबंधित विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, भूस्खलनग्रस्त आणि पाणी साचलेल्या भागांमध्ये मदतकार्य सुरू आहे.
