पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील पवना नदीकाठी सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शाहनवाज नसिमुद्दीन अन्सारी (वय ३०, रा. खडकी), अरुण शिवनंदन सिंग (वय ४६, रा. बोपोडी), जमीर मुज्जमल शेख (वय २०, रा. चिंचवड), अशोक दयाराम पंजवाणी (वय ५०, रा. पिंपरी) आणि मोहमद इब्रार मोहमद सिराज (वय ४२, रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून लुकमान शेठ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी मध्यरात्री १२.०५ वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी रोडवरील पवना नदीकाठी मोकळ्या जागेत हे आरोपी विनापरवाना स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ हजार ६१० रुपये रोकड आणि पत्ते जप्त केले आहेत. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ हजारांची रोकड जप्त
