Pune-विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; सुसज्ज रस्त्यांवर धावतेय जागतिक सायकलिंग स्पर्धा

पुणे(pune) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात रस्त्यांच्या दर्जोन्नतीची व्यापक कामे हाती घेण्यात आली असून, त्याचाच परिणाम म्हणून २६ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान आयोजित होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्हा सज्ज होत आहे.

सन २०२६ मध्ये जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या स्पर्धेने महाराष्ट्राच्या क्रीडा आणि पायाभूत सुविधांची जागतिक स्तरावर प्रभावी छाप पाडली. विविध देशांतील व्यावसायिक सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला, तर हजारो क्रीडाप्रेमींनीही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रस्ते प्रथमच आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून जगासमोर आले आणि त्यांच्या गुणवत्तेची दखल देश-विदेशातील स्पर्धकांनी घेतली.

२०२६ च्या स्पर्धेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २९२.१९ किलोमीटर रस्त्यांचे नूतनीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करून जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये ८२.२५ किलोमीटर रुंदीकरण, २०३.०२ किलोमीटर रीसर्फेसिंग तसेच इतर आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. या कामांमुळे स्पर्धा सुरक्षित, सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडली.

याच यशस्वी अनुभवाच्या आधारावर आता ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केली जात आहे. सहा दिवस चालणारी ही स्पर्धा लेडीज क्लब–नांदेड सिटी, बारामती–सासवड, जुन्नर–राजगुरुनगर, आळंदी–लोणावळा, लोणावळा–टी.सी.एस. सर्कल आणि पी.सी.एम.सी.–पी.एम.सी. अशा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. स्पर्धेचा एकूण मार्ग सुमारे १०९९ किलोमीटर इतका असून, त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३९८.७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर विशेष दर्जोन्नतीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

या अनुषंगाने एकूण ५२ विकासकामांसाठी ₹६२९.२६ कोटींचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून ते प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासनाकडून ₹३६४.२२ कोटी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत ₹२२१.२६ कोटी आणि जिल्हा नियोजन समितीकडून ₹४३.७८ कोटींच्या निधीची तरतूद प्रस्तावित आहे. या निधीच्या माध्यमातून स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावरील रस्ते आंतरराष्ट्रीय निकषांनुसार विकसित केले जाणार आहेत.

२०२६ मधील यशस्वी आयोजनानंतर देश-विदेशातील सायकलिंग संघटना आणि व्यावसायिक स्पर्धकांमध्ये ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ विषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत अधिक देशांतील स्पर्धक, संघ आणि क्रीडाप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला जागतिक सायकलिंग नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्यास मदत होणार असून क्रीडा पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि पायाभूत विकासालाही चालना मिळणार आहे.

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उभारण्यात येणारी दर्जेदार रस्ते व्यवस्था ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात उभारल्या जाणाऱ्या आधुनिक, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे प्रभावी प्रतीक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *