Pimpri chinchwad-मोशी इमारत दुर्घटना; बचावकार्यासाठी आणखी १० ते १५ यंत्रे वाढवणार, दोषींवर कारवाई होणार – आयुक्त विजय सूर्यवंशी
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्यासाठी आणखी १० ते १५ यंत्रे तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली.
विजय सूर्यवंशी म्हणाले, “इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे स्लॅब एकमेकांना चिकटल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या सल्ल्यानुसार अत्यंत काळजीपूर्वक शोधकार्य सुरू आहे.”
या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून, बांधकामातील निष्काळजीपणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या घटनास्थळी विविध यंत्रणांकडून समन्वयाने बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.