केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरून सुरू असलेल्या वादावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यामागे स्वतःचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.
“इथेनॉल धोरणामुळे मला कोणताही वैयक्तिक फायदा होत नाही. माझ्यावर होत असलेले आरोप हे तथ्यहीन असून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे गडकरी यांनी सांगितले. देशाची इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पर्यावरणपूरक इंधनाला प्रोत्साहन देणे आणि प्रदूषण कमी करणे हा इथेनॉल मिश्रण धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या दाव्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अशा दाव्यांना ठोस पुरावे असल्यास ते समोर आणावेत, असे आव्हानही त्यांनी टीकाकारांना दिले.
