पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; जीवे मारण्याची धमकी

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – एका महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांनी मिळून एका तरुणाला गाठून लोखंडी हत्याराने आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. १२ मे) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बावधन ग्रामपंचायत ऑफिस समोरील कट्ट्यावर घडली.
या प्रकरणी आर्यन अंकुश पिसोळे (वय १८, बावधन, पुणे) याने बुधवारी (दि. १३ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनु लाटे (वय १८), विकी लाटे (वय १८) आणि अतुल माने (वय १८, सर्व रा. बावधन, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हे ग्रामपंचायत ऑफिससमोरील कट्ट्यावर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ सुरू केली. आरोपी विकीने लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपराच्या खाली मारले, तर सोनु आणि अतुल यांनी फिर्यादीला पकडून लाकडी दांडक्याने व हाताने बेदम मारहाण केली. फिर्यादी जीव वाचवून पळत असताना ‘तू परत भेट तुला मारून टाकतो’ अशी धमकीही आरोपींनी दिली. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *