Pimpri-Chinchwad-तीन पिस्‍तुलांसह सराईत गुन्‍हेगार जेरबंद गुन्‍हे शाखा युनिट दोनची कारवाई

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या ‘आर्म ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी संभाव्य धोका टाळल्याचे मानले जात आहे.
आर्यन प्रकाश जाधव (वय २०, रा. बावधन) आणि ओमकार सचिन मोरे (वय २३, रा. कोथरुड) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. ओमकार मोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात चंदननगर, सिंहगड रोड आणि कोथरुड पोलीस ठाण्यात अपहरण, मारामारीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात बेकायदेशीर शस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस कर्मचारी रवी पवार यांना चांदणी चौक, बावधन परिसरात दोन संशयित हत्यारांसह येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे ही शस्त्रे कोठून आली, त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त रोहिदास पवार आणि वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *