Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध
पिंपरी-चिंचवड : पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ऑगस्ट महिन्यात विशेष मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ३, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी खेड, १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी मंचर, १७, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी जुन्नर, २४, २५ आणि २७ ऑगस्ट रोजी वडगाव मावळ, तर २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी लोणावळा येथे पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचण्या पार पडणार आहेत.
या चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ५ वाजता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक नागरिकांनी वेळेत स्लॉट बुक करून नियोजित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
ऑनलाइन स्लॉट मर्यादित असल्याने उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर नोंदणी करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.