Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
सोलापूर :
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तसेच ऊर्ध्व भागातील धरणांमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरण सध्या ९७.१३% पेक्षा जास्त भरले असून, हवामान विभागाने पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पूरनियंत्रणासाठी आज (२७ जुलै) दुपारी ४:३० वाजल्यापासून भीमा नदी पात्रात एकूण १६,६०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दौंड येथून पाण्याची प्रचंड आवक
उजनी धरणाच्या वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे आणि सततच्या पावसामुळे दौंड येथील सरिता मापन केंद्रावरून सध्या ६६,५३९ क्युसेक्स एवढी पाण्याची आवक होत आहे. या आवकमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाला नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
नदीपात्रातील विसर्गाचा तपशील:
सांडव्याद्वारे विसर्ग: १५,००० क्युसेक्स (पूर्वी १०,००० क्युसेक्स होता)
विद्युत गृहाद्वारे विसर्ग: १,६०० क्युसेक्स
एकूण विसर्ग: १६,६०० क्युसेक्स
नागरिक व प्रशासनासाठी महत्त्वाचे
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार (Inflow) विसर्गाचे प्रमाण कमी अथवा जास्त केले जाऊ शकते. त्यामुळे भीमा नदीकाठांवरील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील गावांतील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि गुराख्यांनी नदीपात्राजवळ न जाता योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता स. उ. डुंबरे यांनी केले आहे.