Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव
‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान; गवळीमाथा झोपडपट्टीचा देशासाठी आदर्श ठरलेला स्वच्छता मॉडेल
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ‘शून्य कचरा (झिरो वेस्ट स्लम)’ उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. या उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गवळीमाथा येथील श्रीकृष्ण महिला बचत गटाला प्रतिष्ठेचा ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छता चळवळीची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
पुण्यात आयोजित ‘उत्कर्ष भारत सन्मान सोहळा-२०२६’ मध्ये आसरा सोशल फाऊंडेशन आणि ओम पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते विजय गोखले आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते श्रीकृष्ण महिला बचत गटाचा सन्मान करण्यात आला. बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर आणि अश्विनी चौधरी यांनी पुरस्कार स्वीकारला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने १६ ऑगस्ट २०२२ रोजी गवळीमाथा झोपडपट्टीत देशातील पहिल्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्पाची सुरुवात केली होती. या उपक्रमात महिला बचत गटांनी घराघरांत जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती केली. नियमित कचरा संकलन, पुनर्वापर आणि स्वच्छतेबाबत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यातून गवळीमाथा परिसर कचरामुक्त करण्यास मोठे यश मिळाले.
महापौर रवि लांडगे यांनी हा पुरस्कार महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागाचा गौरव असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा उपक्रम राज्यातील इतर शहरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. उपआयुक्त (आरोग्य) डॉ. प्रदीप ठेंगल यांनी योग्य कचरा व्यवस्थापनामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत झाल्याचे सांगितले. तर उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी हा सन्मान इतर झोपडपट्ट्यांनाही ‘शून्य कचरा’ संकल्पनेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
या राष्ट्रीय सन्मानामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला नवी ओळख मिळाली असून, शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.