तरुणावर पिस्तुल रोखले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाला जुन्या ओळखीच्या चौघांनी गाठून जिवे मारण्याची धमकी दिली. “तुला लय माज आहे का, अमोल भोसलेसोबत का फिरतोस?” असे म्हणत एकाने कमरेचे पिस्तुल काढून तरुणावर रोखले. ही घटना जुनी सांगवी परिसरातील दत्‍त आश्रम रोड, नवीन पुलाजवळ शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.
अनिकेत देवेंद्र गायकवाड (वय २४, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी शनिवारी (दि. ९ मे) रोजी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन विधीसंघर्षीत बालकांसह अन्य दोन अशा एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी अनिकेत हे त्यांचे मित्र दत्ता लांडगे आणि पवन अवचरे यांच्यासह दत्त आश्रम रोडवरील नवीन पुलाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हावरून चार आरोपी तिथे आले. त्‍यातील एका आरोपीने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तुल काढले आणि फिर्यादीच्या दिशेने रोखले. “कारे तुला लय माज आहे काय, तू अमोल भोसले बरोबर का फिरतोस, आज तुला खल्लासच करतो” अशी धमकी देत सर्वांनी शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्‍यातील उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *