पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या लॉज मॅनेजरला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. १३ जुलै) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई-पुणे हायवे लगत असलेल्या युवा लॉज येथे करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रद्धा भरगुडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लॉज मॅनेजर हेमंत नांजे गौडा (वय २३, रा. तळेगाव दाभाडे, मूळ – मंडीया, कर्नाटक) याला अटक केली असून लॉज चालक मन्जे गौडा (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ हजार ३० रुपयांच्या मुद्देमालासह पिडित महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपी या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
