डिझेल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर राडा; रॉडने मारहाण

पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले असून आरोपींनी चालकाला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील जय श्रीनाथ पेट्रोल पंपावर घडली.

या प्रकरणात भरत तुकाराम पालवे (४३, डोंगरवस्ती, निघोजे, मूळ रा. बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैद्यनाथ संतोष यादव (३३), लवकुश शिवगणेश यादव (२२), ललित यादव आणि अजय यादव (सर्व रा. निघोजे, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रेलरमध्ये डिझेल भरण्यासाठी गेले असता पेमेंट केल्याचा मेसेज न आल्याच्या कारणावरून त्यांचा पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद मिटल्यानंतर फिर्यादी आपल्या मित्रांसह हॉटेलमध्ये जेवण करत असताना आरोपींनी तिथे येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी जाब विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले असता आरोपींनी लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले. वैद्यनाथ आणि लवकुश यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *